त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समतेच्या विचारांचे प्रेरणास्थळ!
भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांचा विश्वास

स्मारकाच्या कामासाठी निधीला स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती पिंपरी चौकात उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. हे स्मारक समतेच्या विचारांचे प्रेरणास्थळ म्हणून ओळखले जाईल. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर या ठिकाणी होईल, असा विश्वास भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
प्रस्तावित माता रमाई स्मारकाच्या स्थापत्य कामांसाठी आवश्यक निधीला महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिल्यामुळे प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. डॉ. सुहास कांबळे यांनी सांगितले की, माता रमाई या त्याग, संघर्ष आणि सामाजिक समतेच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य स्मारक उभारले जाणे ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या स्मारकामुळे भविष्यातील पिढ्यांना सामाजिक जाणिवेचा आणि प्रेरणेचा वारसा मिळणार आहे.
हेही वाचा – रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीची! सरकार बनवणार खास अभ्यासक्रम
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पाच्या स्थापत्य कामांना मंजुरी देण्यात आली असून, लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. कांबळे यांनी पुढे सांगितले की, स्मारकाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पामुळे सामाजिक ऐक्य आणि कृतज्ञतेचा संदेश अधिक दृढ होईल. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, माता रमाई यांच्या स्मृतीला योग्य सन्मान देणारा हा उपक्रम असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
माता रमाई स्मारकाचा प्रकल्प हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून, सामाजिक समता, त्याग आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या स्मारकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीतील माता रमाई यांचे योगदान नव्या पिढीसमोर अधिक ठळकपणे मांडले जाणार आहे. याकामी आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्मारक उभारले जात असल्याने ते शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीला अधिक बळ देणारे ठरेल. स्थायी समितीने निधीला दिलेली मंजुरी आणि प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली गती पाहता, लवकरच भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण आपण अनुभवणार आहोत. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता, हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, भाजपा.





