मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मालमत्ता कराला विरोध!
पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका, महापौरांचे सकारात्मक आश्वासन

पिंपरी | मोशी–चिखली परिसरात मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या असताना देखील आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराबाबत पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करत मूलभूत सुविधा प्राधान्याने द्याव्यात यासाठी मागणी केली. रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, जलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन तसेच विकास आराखड्यातील (DP) सार्वजनिक सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेने विशेषतः मोशी–चिखली परिसरातील मालमत्ता कर आकारणीचा पुनर्विचार करून मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत मालमत्ता कर माफ किंवा स्थगित करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित विभागांकडून संयुक्त पाहणी करून रस्ते, पाणी, पथदिवे, जलनिस्सारण व इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचा : राज्यसभा बिनविरोध! राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज!
या संदर्भातील विविध समस्या मांडण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राहुल जाधव, विधी समिती अध्यक्षा, नगरसेविका सुजाता निलेश बोराटे आणि नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून संघटनेने महापौर, आमदार तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी संघटनेतर्फे अध्यक्ष सत्यब्रत त्रिपाठी, संस्थापक प्रकाश जुकंटवार, वरिष्ठ अध्यक्ष धीरज सिंह व गिरीश उढाणे, तसेच सदस्य अविनाश खेमनार, प्रणव खेरनार आणि उपाध्यक्ष भरत मोहळ, यांनी महापौर रवि लांडगे, आमदार व नगरसेवक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेतर्फे महापौर रवि लांडगे यांना वहीखाता (लेजर) पुस्तक व पेन भेट देऊन गरजू व गरीब नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत प्रतीकात्मक मागणी व्यक्त करण्यात आली.

नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. शहरातील विविध नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) स्तरावर ५ मार्चपासून सर्व विभागीय बैठक सुरू करण्यात येणार असून या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रलंबित कामांबाबत चर्चा करून ती तात्काळ सुरू करण्यात येईल.
– रवी लांडगे, महापौर, पिं. चिं. मनपा.
पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या अभय योजना राबविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून, मोशी–चिखली परिसरात लवकरात लवकर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.. मात्र, जर अल्पावधीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात सोसायटीधारक नागरिक एक रुपयाही मालमत्ता कर भरणार नाहीत.
– सत्यब्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना.





