एसटीच्या चालक-वाहकांची मद्यपान तपासणी सक्तीची ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मद्यपानास आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची मद्य तपासणी यंत्राद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्यात येणार आहे.
परळ बसस्थानकाला २५ जानेवारी रोजी प्रताप सरनाईक यांनी अचानक भेट दिली होती. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्या होत्या. काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत परिवहन मंत्र्यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून सखोल चौकशी केली.
चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविल्या आहेत. चौकशी अहवाल सरनाईक यांना सादर केला असून निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही दिले आहेत.
हेही वाचा – बँक घोटाळा करणाऱ्यांना कारागृहात जावे लागले, असे का म्हणाले गडकरी?
चालकांची वाहन परीक्षकांद्वारे नियमित मद्यपान तपासणी होणार आहे. वाहकांचीही मद्य तपासणी करून नोंद ठेवणे आवश्यक आहे. चालक – वाहकांची मद्यपान तपासणी झाली की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवायची आहे. आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवायचे आहे. बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात (कामाची) लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा
तपासणी करूनच मार्गावर पाठविण्याची सक्ती असणार आहे.बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांमधील कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी मद्यपान तपासणी करून नोंद ठेवणे बंधनकारक आहे.
दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्ग तपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांसह सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणामांबाबत प्रबोधन केले जाणार आहे. आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे.





