शहरात अनधिकृत रस्ते खोदाई; महापालिकेचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्ते खोदाईसाठी दिलेली १५ मे ची मुदत संपल्यानंतरही शहरात काही ठिकाणी बेकायदा खोदाई सुरू असल्याचे आढळले आहे. यामुळे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी खोदाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले असून, अन्यथा दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
महापालिका, स्मार्ट सिटी, महावितरण, एमएनजीएल, खासगी नेटवर्किंग कंपन्या यांसह विविध शासकीय-निमशासकीय संस्था स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, केबल आणि पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते व पदपथ खोदतात. मात्र, खोदकामानंतर व्यवस्थित दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. यामुळे महापालिकेने १५ मे नंतर खोदाईस बंदी घातली होती.
हेही वाचा : मदरशांमध्ये शिकवले जाणार ‘ऑपरेशन सिंदूरचे’ धडे; मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा
मात्र, भोसरीतील लांडेवाडी रस्त्यावरील एमआयडीसी चौकात १९ मे रोजी केबल टाकण्यासाठी पदपथ खोदण्यात आला. महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने ही खोदाई थांबवली. तसेच, निगडी ते दापोडी मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाईन आणि जलवाहिनी टाकण्यासाठी बीआरटी मार्ग खोदला आहे. पिंपळेगुरवमधील कृष्णराज कॉलनीसह अंतर्गत रस्त्यांवर जलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
खोदाईसाठी दिलेली मुदत संपली आहे. आता केवळ पाणीपुरवठा, विद्युत अशा अत्यावश्यक कामांसाठी खोदकामास परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त कोणालाही परवानगी नाही. खोदकाम केल्यास सुरुवातीला दंडात्मक आणि नंतर फौजदारी कारवाई करण्यात येईल. खाेदलेले रस्ते, चर बुजविण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता.