मदरशांमध्ये शिकवले जाणार ‘ऑपरेशन सिंदूरचे’ धडे; मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा

Operetion Sindoor | उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेली यशस्वी कारवाई आता राज्यातील मदरशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहे. ही घोषणा त्यांनी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केली.
मुफ्ती शमून कासमी यांनी सांगितले की, उत्तराखंड हे वीरभूमी आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याची आणि देशभक्तीची गाथा मदरसांमधील विद्यार्थ्यांना शिकवली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना बळकट होईल आणि त्यांना आपल्या सैन्याच्या पराक्रमाची माहिती मिळेल.
हेही वाचा : सावधान! कोकण, घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
त्यांनी पुढे नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर हा भारतीय सैन्याचा एक ऐतिहासिक आणि धाडसी प्रयत्न होता, ज्यामध्ये 7 मे 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या अभियानात सुमारे 100 दहशतवादी ठार झाले होते.
उत्तराखंडमध्ये सध्या 451 नोंदणीकृत मदरसे असून, त्यामध्ये जवळपास 50,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरशी संबंधित एक स्वतंत्र अध्याय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. यासाठी लवकरच एक विशेष अभ्यासक्रम समिती स्थापन केली जाईल, ज्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, सैन्य इतिहासकार आणि मदरसा शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असेल. ही समिती हा विषय कोणत्या वर्गात आणि कोणत्या स्वरूपात शिकवायचा याचा निर्णय घेईल.