मुंबई–पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासन व मेट्रो अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा भाजप चिटणीस सचिन काळभोर यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड : निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते चिंचवड स्टेशनदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे कामामुळे मुंबई–पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते दिसेनासे झाले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असल्याने त्रस्त झालेले प्रवासी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रशासनाला इशारा दिला की, गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.
हेही वाचा : कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या मार्गावरील खड्ड्यांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन व मेट्रो रेल्वे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली असूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
सुमारे वर्षभरापूर्वी अर्बन स्ट्रीट योजना अंतर्गत निगडी ते आकुर्डी खंडोबा माळ रस्त्यावरील सिमेंट काँक्रीट रस्ता ८५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. पण या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्य मागण्या:
खड्ड्यांवर तातडीने दुरुस्तीचे काम करावे
संबंधित ठेकेदारांकडून खर्चाची वसुली करावी
स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करावा





