कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान

पिंपरी चिंचवड | “गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया” या गजरात, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “मोरया पुरस्कार” सोहळा नुकताच निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. शेखर सिंह तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सन २०२४ या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा “मोरया पुरस्कार” जाहीर झाला असून, मोशी येथील शिवशंभो प्रतिष्ठानला द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. गेली वीस वर्षे शिवशंभो प्रतिष्ठानने गणेशोत्सवाचे आयोजन करून सामाजिक प्रबोधन, स्वच्छतेची चळवळ, गरजूंपर्यंत मदतीचा हात, संस्कृती व परंपरेचे जतन अशा अनेक उपक्रमांद्वारे शहरात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीय व सामाजिक जाणीव असलेले पोलीस आयुक्त
मोरया पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांचा कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीपूर्ण व सामाजिक जाणीव असलेली भावना विशेषत्वाने अधोरेखित झाली. कायदा व सुव्यवस्था राखणे हे जसे त्यांच्या कार्याचे प्रमुख अंग आहे, तसेच समाजातील सकारात्मक उपक्रमांना चालना देणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे आणि गणेशोत्सवासारख्या परंपरेच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवणे हीदेखील त्यांची कार्यपद्धती असल्याचे या पुरस्कार सोहळ्यातून अधोरेखित झाले.
हेही वाचा : गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या

“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाच्या प्रगतीचा आणि एकतेचा मार्ग आहे. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन हा उत्सव सामाजिक ऐक्य व बंधुभाव निर्माण करतो. समाजातील उपक्रमांना पोलीस प्रशासन सदैव पाठिंबा देईल” असा प्रेरणादायी संदेश आयुक्त श्री. चौबे यांनी दिला.
शिवशंभो प्रतिष्ठानने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त करताना सांगितले की, “पोलीस आयुक्तालयाने आम्हाला दिलेला हा सन्मान केवळ गौरव नाही तर अधिक मोठी जबाबदारी आहे. श्री. विनयकुमार चौबे यांचे मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांबद्दलची त्यांची दृष्टी आम्हाला सतत प्रेरणा देणारी आहे.”
पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक सलोखा, सुरक्षित वातावरण आणि प्रगतिशील उपक्रमांचा संगम घडविण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या संवेदनशील नेतृत्वाला जाते, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.





