‘माता सदा सर्वकाळ वंदनीय’; पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ
पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ "हिंदू कुलभूषण" पुरस्काराने सन्मानित

पिंपरी : माता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. राजमाता जिजाऊ यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. मातेचे पूजन ही आपली संस्कृती आहे. भूमाता, राजमाता, किंवा सामान्य जणांची माता सदा सर्वकाळ वंदनीय आहे असे मत ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, , शिवजयंती उत्सवाचे समन्वयक कैलास बारणे व खजिनदार दत्ता सूर्यवंशी, सुहास पोफळे, अतुल आचार्य, कुमार जाधव, रमेश स्वामी, दिलीप कुलकर्णी, दिगंबर रिद्धीवाडे, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, शिवाजी रेड्डी, ॲड. देवदास शिंदे, मनोज गोबे, मनोज बोरसे, सुरेंद्र कर्मचंदानी अलका आर्य, तेजस्विनी जटाळ आदीं उपस्थित होते.
यावेळी पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, १९५२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेत स्वतंत्र भारताची दिनदर्शिका करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दबावात आले, त्यांनी समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष मेघनाथ साह व पुण्यातील दैनिक केसरीचे प्रतिनिधी आणि देशभरातील इतर सहा सदस्य होते. १९५७ मध्ये दोन्ही संसद सभागृहात दिनदर्शिका मंजुरीबाबत ठराव पास झाला. परंतु आद्यपही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही.
हेही वाचा – अतिरिक्त आयुक्तांची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’
कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले संसदेत बोलणाऱ्या खासदारांनी किमान तयारी करुन चर्चेत सहभाग घ्यावा व नंतर आपले मत व्यक्त करावे. संसद सभागृहात आपला स्वार्थ समोर ठेवून राजकीय मुद्दा मांडू नये, तर राष्ट्रीय स्वार्थ नजरेसमोर ठेवून राजकीय मुद्दा मांडला पाहिजे असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोकांनी केवळ एका जातीच्या चौकटीत बसवले आहे. काही लोक जाणून बुजून त्यांचे खरे कार्य लोकांच्या नजरेसमोर आणण्यास इच्छुक नाहीत.डॉ . बाबासाहेब आंबेडकर आपल्यापेक्षा मोठे व्हायला नको असे त्यांना वाटते. संसदेतील चर्चेत धर्मनिरपेक्षते बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य मुद्दा होता की, भारताच्या मातीत आणि सनातनी च्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे. या धर्मनिरपेक्षतेला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नका असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.
कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले सावरकर ही व्यक्ती नसून विचार आहे. आरती, पूजापाठ करून कुणी हिंदू होत नाही, आचरणाने हिंदू झाले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात हिंदूंनी दुसऱ्याच्या धर्मस्थळावर, पूजा पद्धतींवर आक्रमण केल्याचे उदाहरण नाही. ही वेळ हिंदू मुस्लिम करण्याची नाही. तर सनातन सभेची पुनर्स्थापना करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. हिंदू संस्कृती पुढच्या पिढीकडे देण्याचे काम स्व. धर्मवीर आर्य यांनी स्थापन केलेले हिंदू प्रतिष्ठान करत आहे. सनातन एक सभ्यता आहे, विज्ञान आहे, पंचतत्व आहे. सनातन हा धर्म ब्रम्हांडाच्या उत्पत्ती पासून आहे.
स्वागत कृष्णकुमार गोयल, सूत्रसंचालन व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोकळे यांनी मानले.
संवाद होणे गरजेचे
मोबाईल मुळे कुटुंबातील व्यक्तींचे संवाद बंद झाले आहेत. त्यामुळे सर्व ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर संवाद वाढवावा. विशेष करून वयात आलेल्या मुलींबरोबर घरातील ज्येष्ठांचा संवाद झाला पाहिजे. जर संवाद होत नसेल तर, ती वयात आलेली तरुणी बाहेरील व्यक्तीशी संवाद साधेल आणि मग अडचणी वाढतील. आजचे युवक हे बुद्धिमान आहेत.युवकांच्या शक्तीमुळे देशात सत्तांतर झाले आहे. यामध्ये संचार क्रांती आणि समाज माध्यमांचे मोठे योगदान आहे असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.