सांगवी येथे पवनाथडी जत्रेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : शहरातील महिला बचत गटांना सक्षम करण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वाटा महत्वपूर्ण असून देश सक्षमीकरण करताना महिलांचे सक्षमीकरण करणे देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘पवनाथडी’ जत्रेचे उदघाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आणि आमदार उमा खापरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार आण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रिया बनसोडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे, सागर आंघोळकर, धनराज बिर्दा,माजी नगरसदस्या माई काटे, सविता खुळे, उषा मुंढे, चंदा लोखंडे, शमीम पठाण, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, दिलीप धुमाळ,दिव्यांग भवन फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, कार्यालय अधिक्षक अनिता बाविसकर, तसे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध महिला बचत गटांतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी तरतूदीत वाढ करून प्रयत्न करावेत,शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे असे सांगून त्यांनी पवनाथडी जत्रेतील स्टॉलधारकांना शुभेच्छाही दिल्या.
हेही वाचा – मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
आपल्या शहरातील महिला सुगरणी आहेत. त्यामुळे त्यांच्या खाद्य पदार्थांना पवनाथडीच्या माध्यमातून स्टाॅल्स उपलब्ध करून दिले जातात. शहरातील बाकी महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी असेच स्टॉल्स महापालिकेने चिंचवडकरांसाठीही उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली.
यावेळी बोलताना अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की पवनाथडी जत्रेत यंदा स्टॉलची संख्या वाढविण्यात आली आहेत. यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी यांना देखील स्टॉल वाटप करण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी होत असतात असे सांगून शहरातील नागरिकांनी देखील महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी,तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थाची मेजवानी करण्यासाठी पवनाथडी जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि विकास गायकांबळे, ओंकार जाधव, पौर्णिमा भोर, विजया सोळंके यांनी केले तर समाज विकास विभागाच्या प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर सुरु झालेल्या “महाराष्ट्राची गौरव धारा” या कार्यक्रमाला देखील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत आनंद अनुभवला.