गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात
मोरया शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड : मोरया शिक्षण संस्था, चिंचवड यांच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन आणि इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब गरवारे आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. मा. श्री. विलास उगले सर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. स्वप्निलजी शेडगे होते.
या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना मेडल, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी मोरया शिक्षण संस्थेचे कार्यवाह आणि प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर, संस्थेचे खजिनदार श्री. रणजीत सावंत, तहहयात विश्वस्त श्री. ऋत्विक पिसोळकर, श्री. अमित फडके, कार्यकारी सदस्य श्री. अभिषेक देव, डॉ. मनोजकुमार दवणे, कार्यकारी सदस्या सौ. प्रतिभाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, तरी कामकाज इंग्रजीत का? विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांनी संस्थेच्या विविध शाळांमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच विविध शालेय व शालाबाह्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेत संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा १००% निकाल लागल्याबद्दल त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली कोल्हे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय श्री. हनुमंत हुचगोळ यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यकारी सदस्या सौ. प्रतिभाताई कुलकर्णी यांनी केले. मोरया शिक्षण संस्थेच्या या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य ते प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यातही असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थी-पालकांची उपस्थिती लक्षणीय…
प्रमुख पाहुणे डॉ. विलास उगले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे आठ मोठे तोटे समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांपासून योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला. तसेच शिक्षक, पालक आणि शाळेच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांना घडवणे शक्य होते, हे अधोरेखित केले. कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. विशाल कांबळे, माता पालक संघाच्या उपसचिव मा. सौ. अर्चना क्षिरसागर, उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे, शिक्षक समन्वयक श्री. संजय खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.





