पिंपरी / चिंचवड

‘मागची पाने आम्ही चाळली तर अजित दादांना बोलता येणार नाही’; चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी चिंचवड: आम्ही मागची पानं चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही, असा थेट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवडच्या दिघी येथील सभेत अजित पवारांना दिला आहे. 70 हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात सुनावणी सुरु आहे, त्याचा काय निकाल येईल, त्यावर आपण पुढं जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे, अजून निकाल लागलेला नाही. अशा शब्दात बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा डिवचले आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे, अशातच राज्यात सत्तेत सोबत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या काहीशी तू तू मैं मैं सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे तुम्हाला माहिती असेल. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना, असा युक्तिवाद करत अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना कोंडीत पकडले आहे. त्यावर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिलं त्यानंतर आता याप्रकरणी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजक्या शब्दातच अजित पवारांना डिवचले आहे

हेही वाचा –  प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाच्या प्रचाराचा धडाका; ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बावनकुळे म्हणाले, अजित दादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करणे योग्य नाही. अजित दादा याचा विचार करतील. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असे ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित दादांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं बोलायचं नाही. असं महायुती समन्वय बैठकीत ठरलं होतं. तरी ते असं का वागले, असं का बोलले, याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असं बोलायला नको होतं. ते राज्यातील महत्वाचे नेते आहेत, मी त्यांना फार सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरेच वर्षे सत्तेत होते. आता आम्ही मागची पानं पलटली, चाळली तर त्यांना ही काही बोलता येणार नाही. मात्र मागची पानं उलटायची आमची ही इच्छा नाही. त्यामुळं अजित दादांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागावे, असा थेट इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button