Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना’; निवासी आयुक्त श्वेता सिंघल

नवी दिल्ली : येथील भारत मंडपम येथे भरवण्यात आलेल्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योग निर्यातीला देशपातळीवर आणि जागतिक स्तरावर निश्चितच मोठी चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या येथील निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनातील महाराष्ट्राच्या दालनाला खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनाची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल म्हणाल्या  महाराष्ट्राचे दालन अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारण्यात आले असून राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योगाची ओळख प्रभावीपणे करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग निर्यातीला देशपातळीवर आणि जागतिक स्तरावर निश्चितच मोठी चालना मिळेल. महाराष्ट्राकडे भक्कम उत्पादन पाया, उत्कृष्ट कुशल मनुष्यबळ आणि उत्तम संशोधन संस्था असून, या बळावर आपण वस्त्रोद्योगाच्या विकासाचा एक नवा टप्पा सुरू करत आहोत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

हेही वाचा –  ‘शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा यांनी यावेळी महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रगतीची माहिती दिली. महाराष्ट्र  हे देशातील वस्त्रोद्योगाचे एक प्रमुख जागतिक केंद्र आहे. राज्याच्या ‘एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ अंतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला आपण अग्रक्रम दिला आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे राज्यात एकूण सहा तांत्रिक वस्त्रोद्योग उद्याने स्थापन केली जात आहेत. याशिवाय, तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन, नवकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र ‘महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान’ जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना ५५ टक्के किंवा २५० कोटी रुपयांपर्यंतचे भरीव भांडवली अनुदान देण्यासोबतच, गुणवत्ता आणि शाश्वततेसाठी सौर ऊर्जा अनुदान व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीलाही आपण विशेष प्रोत्साहन देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र दालनास मोठा प्रतिसाद

या मुख्य दालनात सोलापूरच्या विणकाम व्यवसायापासून हातमाग, रेशीम उद्योग, पारंपरिक वस्त्रकला, आधुनिक फॅशन आणि अमरावती येथे विकसित होत असलेल्या ‘प्रधानमंत्री मित्र वस्त्रोद्योग उद्याना’पर्यंतच्या राज्याच्या संपूर्ण वस्त्रोद्योगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. विशेषतः पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या चादरी आणि भौगोलिक मानांकन प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना देश-विदेशातील खरेदीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button