‘पिंपरी- चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे सामूहिक उद्दिष्ट’; आयुक्त शेखर सिंह

पिंपरी- चिंचवड: पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि साधनसामग्री वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल. शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्र अधिक सजग राहावे, यासाठी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका व इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी -चिंचवड शाखा (आयएमए-पीसीबी), पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन (पीसीडीए) आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (एनआयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मान्सूनपूर्व काळजी’ या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. या उपक्रमात शहरातील तीनशेहून अधिक खासगी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हेही वाचा – आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला
आयुक्त सिंह म्हणाले, डॉक्टरांनी ‘चेक, क्लीन, कव्हर’ ही त्रिसूत्री आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून शहर पातळीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवता येतील. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आपल्या सर्वांचे सामूहिक उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आयुक्त सिंह म्हणाले.