पिंपरीतील प्रलंबित विकासकामांवर आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा
नगरसेवक डब्बू आसवानी यांचा पुढाकार : प्रभागातील विविध १८ मुद्द्यांवर सविस्तर आढावा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी परिसरातील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी डब्बू आसवानी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांची सोमवारी (दि. २०) भेट घेण्यात आली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित १८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेत पिंपरी मार्केट परिसरातील पार्किंग समस्येवर तोडगा म्हणून मल्टीलेव्हल पार्किंग उभारणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच साई चौक, शगुन चौक, डिलक्स चौक, जमतानी चौक, त्रिलोक स्मशानभूमी चौक आणि भाटनगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, या पुलाला “लोकनेते दिवंगत मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल” असे नाव देण्याचा प्रस्तावही बैठकीत सादर करण्यात आला.
हेही वाचा
मुंबई विरूद्ध चेन्नई हाय व्होल्टेज सामना; रोहित-धोनी आज खेळणार का?
आरोग्य व स्वच्छता विषयक चर्चेत कचरा संकलनातील त्रुटी, तसेच प्रभाग २१ मधील आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पिंपरी म्हाडा परिसरातील आरक्षित जागेवर २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारणे, बुस्टर पंप बसवणे आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतही चर्चा झाली. नागरी सुविधांच्या अनुषंगाने जन्म-मृत्यू विभागातील दाखले तातडीने उपलब्ध करून देणे, उद्यानांची देखभाल सुधारून रखवालदार नेमणे, तसेच खेळाची मैदाने विकसित करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. शहरातील वाढती बेघर व्यक्तींची समस्या आणि रस्त्यावरील बेवारस वाहनांचा प्रश्न यावरही तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी गटार, ड्रेनेज आणि नाले यांची आधुनिक पद्धतीने स्वच्छता करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. या बैठकीमुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना लवकरच ठोस सुधारणा दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीस नगरसेविका निकिता ताई कदम, नगरसेविका प्रियांका ताई कुदळे, तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
“पिंपरीतील प्रत्येक प्रलंबित प्रश्नाचा निपटारा हा आमचा केवळ आश्वासन नसून जबाबदारी आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करत राहू. पिंपरीला अधिक सक्षम, स्वच्छ आणि आधुनिक शहर बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
— डब्बू आसवानी, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका.





