चाकण, हिंजवडी, दिघीत चौघांना अटक : तीन पिस्टल, कोयता जप्त

पिंपरी l प्रतिनिधी
चाकण, हिंजवडी आणि दिघी पोलिसांनी चौघांना बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन पिस्टल आणि एक कोयता अशी शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 1) चाकण, हिंजवडी आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
किशोर दत्तात्रय पाटे (वय 23, रा. चाकण) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी किशोर मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता चाकण येथील रोहकल रोडवर पिस्टल विक्रीसाठी आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी किशोर याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी किशोरला अटक केली आहे.
शुभम तानाजी चव्हाण (वय 26, रा. कासारसाई, ता. मुळशी), अजय गुरप्पा नाटेकर (वय 19, रा. मारुंजी, ता. मुळशी) या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून शुभम आणि अजय या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे प्रत्येकी एक लोखंडी कट्टा आढळून आला. पोलिसांनी 50 हजारांचे दोन कट्टे (पिस्टल) जप्त करत आरोपींना अटक केली.
रवी देविदास जाधव (वय 19, रा. सावंत नगर, दिघी) याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रवी याने त्याच्या ताब्यात अवैधरित्या लोखंडी कोयता बाळगला. याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.





