प्रस्तावित विकासकामांसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा हस्तांतरणासाठी पाठपुरावा
- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक - आमदार शंकर जगताप यांचा सक्रीय पुढाकार

पिंपरी-चिंचवड : पिंपरी–चिंचवड शहराच्या दीर्घकालीन आणि नियोजनबद्ध विकासासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा सक्रिय पुढाकार घेतला आहे. ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची जागा पिंपरी–चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीसंदर्भात आमदार जगताप यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या ताथवडे येथील जागेचे महत्त्व अधोरेखित केले. या जागेच्या माध्यमातून ४५ मीटर स्पाईन रोड, पवना नदीवरील प्रस्तावित पूल, एसटीपी (STP), अग्निशमन केंद्र, ईएसआर (ESR) आणि रुग्णालय यांसारख्या अत्यावश्यक नागरी सुविधांची उभारणी नियोजित असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – भाजपा युवा मोर्चातर्फे ‘अर्थसंकल्प प्रचार-प्रसार संमेलन’ उत्साहात
या संदर्भात यापूर्वी मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठका, अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहण्या, पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेली प्राथमिक सहमती तसेच विकास आराखड्यातील तरतुदी यांचा तपशीलवार आढावा आमदार जगताप यांनी मंत्री महोदयींसमोर मांडला. शहराचा विकास करताना पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, तसेच विभागासाठी पर्यायी आणि योग्य जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याची भूमिका आमदार जगताप यांनी स्पष्ट केली. त्यांच्या या सकारात्मक आणि समन्वयात्मक भूमिकेची दखल घेत मा. पंकजाताई मुंडे यांनीही विषयावर अनुकूल प्रतिसाद दिला.
पिंपरी–चिंचवडसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधत कायदेशीर व प्रशासकीय चौकटीत योग्य निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे. पिंपरी–चिंचवड शहराच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी आमदार शंकर जगताप सातत्याने पाठपुरावा करत असून, नागरिकांच्या हिताचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न पुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“पिंपरी–चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे आणि या वाढीला समर्थ पायाभूत सुविधा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ताथवडे येथील जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यास ४५ मीटर स्पाईन रोड, पूल, रुग्णालय व इतर अत्यावश्यक सुविधा उभारण्यास मोठी गती मिळेल. पशुसंवर्धन विभागाच्या कार्यात कोणतीही अडचण येऊ न देता पर्यायी जागेची व्यवस्था करून हा प्रश्न सकारात्मकरीत्या मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.




