भाजपा युवा मोर्चातर्फे ‘अर्थसंकल्प प्रचार-प्रसार संमेलन’ उत्साहात
युवकांना उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन; स्टार्टअप, कौशल्य विकास व करसवलतींची सविस्तर माहिती

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अर्थसंकल्प प्रचार-प्रसार संमेलन’ उत्साहात आयोजित करण्यात आले. या संमेलनात अर्थसंकल्पातील विविध योजना तसेच त्याचा युवकांना होणारा फायदा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीचे सरचिटणीस हनुमंत लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांनी भूषविले.
हनुमंत लांडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून विकसित भारताचा पाया रचणारा आहे. विशेषतः कामगार आणि मध्यमवर्गीयांच्या हिताचे रक्षण यामध्ये करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधींमुळे तरुणांचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे.”
हेही वाचा – माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान; ग्रामपंचायतींसाठी पाच कोटींचे पुरस्कार…
अध्यक्षीय भाषणात शत्रुघ्न काटे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक नगरीतील युवकांनी विविध योजनांचा लाभ घेत उद्योजकतेकडे वळावे.” युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या योजना घराघरात पोहोचवून सर्वसामान्यांना सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संमेलनात स्टार्टअप इंडिया, कौशल्य विकास, कररचनेतील सवलती आणि युवकांसाठीच्या विविध योजनांवर विशेष सादरीकरण करण्यात आले. अर्थसंकल्पातील सकारात्मक बाबी सोप्या भाषेत स्पष्ट करणारी माहितीपत्रकेही यावेळी वितरित करण्यात आली. शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने युवक व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
या संमेलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात शहरातील विविध ठिकाणी अशाच प्रकारची माहिती सत्रे आयोजित करण्याचा मानस युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, पूर्व शहराध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा सरचिटणीस सुमित घाटे, प्रसाद कस्पटे, दिनेश काटे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरातील प्रत्येक युवकाने या अर्थसंकल्पातील संधी ओळखून पुढे यावे. केंद्र सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवा मोर्चा कार्यकर्ते घराघरात जाऊन माहिती देऊन युवकांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




