ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाईन्यूज On The Spot : प्रभाग ११ मध्ये जॉगर्स पार्कमधील मोकळ्या जागेवर अतिक्रमण!

महापालिका प्रशासनाची डोळेझाक : कारवाई होत नसल्याने नागरिकांची नाराजी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्कमध्ये उघडपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “कायद्याचा धाक उरला आहे का?” असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

चिखली मैला शुद्धीकरण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जॉगर्स पार्कची सुमारे २५ एकर विस्तीर्ण जागा नागरिकांसाठी आरोग्यदायी श्वास घेण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. एका बाजूला एसटीपी प्लांट असून उर्वरित परिसरात गोलाकार मातीचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. रोज सकाळ-संध्याकाळ हजारो नागरिक येथे वॉकिंगसाठी येतात. एवढेच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून पोलीस भरतीची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने येथे सरावासाठी उपस्थित असतात.

मात्र, या सार्वजनिक ठिकाणीच आता बेकायदेशीर बांधकामांनी डोके वर काढले आहे. गार्डनच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सुरक्षा केबिनमध्येही घुसखोरी झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी उभारलेली ही यंत्रणाच आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.

हेही वाचा     :              “मास्टर”होण्यासाठी रियाज, सातत्य अत्यावश्यक : शिल्पकार प्रमोद कांबळे 

नागरिकांचा आरोप आहे की, प्रभावशाली घटकांच्या पाठबळामुळे हे सर्व प्रकार सुरू असून प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत आहे. “सामान्य नागरिकांनी छोटासा नियम मोडला तरी कारवाई होते, पण इथे उघडपणे चाललेल्या अतिक्रमणावर कोणाचा हात आहे?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आरोग्य, सुरक्षा आणि सार्वजनिक हक्कांशी संबंधित असलेल्या या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांचा उद्रेक अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जॉगर्स पार्क वाचवण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी त्वरित कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी करत आहोत, पण प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. जॉगर्स पार्क हे आमच्यासाठी केवळ फिरण्याचं ठिकाण नाही, तर आमच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. इथेच आमची मुलं पोलीस भरतीची तयारी करतात. पण आता अतिक्रमणामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभावशाली लोकांच्या दबावामुळे कारवाई होत नाही का, असा संशय येतो. जर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली नाहीत, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

– स्थानिक नागरिक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button