राष्ट्रीय अस्मिता आणि समाजजागृतीचा दस्तऐवज; ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ प्रकाशित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे जिल्हा कार्यवाह मा. श्री. नरेंद्रजी पेंडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थित म्हणून भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक वार्तापत्रचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी श्री. निखिल देविदास वझे यांचीही उपस्थिती लाभली.
या ग्रंथामध्ये गेल्या शंभर वर्षांतील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, विविध सामाजिक व राष्ट्रीय चळवळी, संघटनात्मक कार्य, विचारप्रवाह आणि संघर्षमय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. समाजपरिवर्तन, सांस्कृतिक जतन, राष्ट्रीय अस्मिता आणि संघटनशक्ती यांचे ऐतिहासिक संदर्भांसह विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. विविध टप्प्यांवर आलेल्या आव्हानांचा उल्लेख करत त्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या चळवळींचे दस्तऐवजीकरण या ग्रंथात करण्यात आले आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना मा. श्री. नरेंद्रजी पेंडसे यांनी मराठी साहित्यातील नवरसांची ओळख करून दिली. मराठी भाषा ही समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली असून तिच्या माध्यमातून समाजमन घडते, असे त्यांनी नमूद केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पाच प्रमुख विषयांवर समाजप्रबोधन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संदेश काटे पाटील, श्री. राजाभाऊ मासूळकर, श्री. अभिजित बोरसे, श्री. अमित नेमाणे, श्री. संदीपशेठ काटे, श्री. संजय शेठ भिसे, श्री. दिनेश काटे पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना या विशेष अंकाचे वितरण करण्यात आले. सोहळा उत्साहपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ हा ग्रंथ आपल्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सशक्त दस्तऐवज आहे. शंभर वर्षांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या संघटनशक्तीने समाजाला दिशा दिली आहे. आजच्या तरुण पिढीने इतिहास समजून घेत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा या ग्रंथातून घ्यावी. राष्ट्रीय अस्मिता दृढ करत सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा ग्रंथ निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.




