“ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करणे ही सामाजिक जबाबदारी” : विनायक भोंगाळे
तुलसीबाई रंगलालजी झांबड महाविद्यालयात यशस्वी ‘‘कॅंपस ड्राईव्ह’’

पिंपरी-चिंचवड : तुलसीबाई रंगलालजी झांबड महाविद्यालय, नंदुरा येथे दिनांक २८ जून २०२५ रोजी योगेश एंटरप्रायझेस यांच्या सहकार्याने यशस्वी कॅंपस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अनेक विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे विश्वस्त मा. वर्धमान प्रेम झांबड, योगेश एंटरप्रायझेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. योगेश विनायकराव भोंगाळे, मार्केटिंग प्रमुख मा. श्री. शैलेंद्र सिंह, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. मनोज जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्राचार्य मा. मनोज जैन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ग्रामीण भागातील युवकांमध्ये अफाट क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते निश्चितच यशस्वी होऊ शकतात. अशा कॅंपस ड्राईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळते.”
मार्केटिंग प्रमुख मा. शैलेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील प्रशिक्षण सुविधा, करिअर संधी व इतर लाभांविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह त्यांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
हेही वाचा – वाहतूकदार 1 जुलै मध्यरात्रीपासून करणार “चक्काजाम”
मा. योगेश विनायकराव भोंगाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वास आहे, मात्र योग्य व्यासपीठाची कमतरता असते. त्यामुळे अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी आत्मभान व प्रेरणेचा स्रोत ठरेल.”
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, योगेश एंटरप्रायझेसचे वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संधीचा पुरेपूर लाभ घेत आत्मविश्वासाने भरलेला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट समन्वयक सौ. मीनाक्षी मॅडम यांनी सर्व मान्यवर, विद्यार्थी व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाविद्यालयात असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक करिअर संधी उपलब्ध होतील.”