चीनमध्ये कोळशाच्या खाणीत भीषण गॅस स्फोट; ८२ कामगारांचा मृत्यू, ९ जण अजूनही बेपत्ता

China Coal Mine Explosion at Liushenyu mine | चीनमधील शांक्सी प्रांतात एका कोळशाच्या खाणीत झालेल्या अत्यंत भीषण गॅस स्फोटात किमान ८२ जणांचा मृत्यू झाला असून ९ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वात मोठा आणि भीषण खाण अपघात मानला जात असून, बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
चिनी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शांक्सी प्रांतातील टोंगझोऊ ग्रुपच्या लियुशेन्यू कोळशाच्या खाणीत झाला. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी ७:२९ वाजता (११:२९ GMT) खाणीच्या आत गॅसचा मोठा स्फोट झाला.
हेही वाचा
विराट आणि हेडमध्ये भर मैदानात वाद! सामना संपल्यावर विराटने हस्तांदोलनही टाळलं; व्हिडिओ व्हायरल
दुर्घटना घडली तेव्हा खाणीत होते २४७ कामगार
हा भीषण स्फोट झाला तेव्हा खाणीच्या आत २४७ कामगार आपले कर्तव्य बजावत होते. स्फोटानंतर खाणीचा काही भाग कोसळल्याने अनेक कामगार आतच अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ धाव घेतली असून, खाणीतील परिस्थितीचा आढावा घेत जिवंत राहिलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप जखमी कामगारांची अचूक संख्या किंवा गॅस स्फोटाचे नेमके कारण याबद्दल अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही.
अध्यक्ष शी जिनपिंग यांचे चौकशीचे आदेश
या भीषण दुर्घटनेची दखल घेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रशासनाला मदत कार्यात कोणतीही कसर न सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच, या भीषण अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी याला जबाबदार आढळतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देशही जिनपिंग यांनी सरकारला दिले आहेत. या जीवघेण्या अपघातानंतर शांक्सी प्रांतात कडक सुरक्षा तपासणी आणि मदत कार्य सुरू आहे.





