वाहतूकदार 1 जुलै मध्यरात्रीपासून करणार “चक्काजाम”
"ई - चलन कार्यप्रणाली" विरोधात वाहतूकदार आक्रमक

पिंपरी चिंचवड :“ई – चलन कार्यप्रणाली” ही माल व प्रवासी वाहतूकदार व्यवसायिकांची गळचेपी करणारी यंत्रणा आहे, याकडे तसेच वाहतूकदारांच्या इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व वाहतूक व्यावसायिक १ जुलै मध्यरात्री १२ पासून स्व – इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यवसायिकांच्या संघटना स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत अशी माहिती सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे या संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली.
यावेळी असोसिएशन ट्रान्सपोर्टर्स पुना (रजिस्टर) या संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम, कार्याध्यक्ष अनिल शर्मा, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, सचिव अनुज जैन, खजिनदार विनोद जगजंपी, उपाध्यक्ष सतनाम सिंग पन्नू , सह खजिनदार तेजस ढेरे, कोअर कमिटी सदस्य प्रमोद भावसार, सुभाष शर्मा, सुभाष धायल आदी उपस्थित होते.
हेही वाचा – भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरला ! ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, उद्या होणार अधिकृत घोषणा
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की, “ई – चलन कार्यप्रणाली” वाहतूक व्यवसायिकांवर अन्याय करणारी आहे. याविषयी वाहतूकदार बचाव कृती समिती आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रवासी व माल वाहतूकदार व्यवसायिकांच्या वतीने मुख्यमंत्री तसेच राज्य सरकारला अनेक वेळा नम्र निवेदन देण्यात आले. तरी देखील राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. या प्रणाली नुसार वाहतूकदारांकडून जबरदस्तीने दंड वसूली केली जाते ती ताबडतोब थांबवावी, विनाकारण लावलेले या अगोदरचे सर्व दंड पूर्णतः माफ करावे, क्लिनर ठेवण्याची सक्ती नसावी, माल वाहतूकदारांना शहर व शहरालगत परिसरात वाहतूक करण्यासाठी अनेक ठिकाणी अन्यायकारकपणे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूकदारांचा इंधन खर्च वाढतो व उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. याविषयी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाहतूकदार बचाव कृती समितीच्या वतीने व वाहतूकदार व्यवसाय प्रतिनिधींच्या वतीने मुंबई, आझाद मैदान येथे १६ जून २०२५ पासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणास राज्यातील सर्वच वाहतूक व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा आहे. त्यानुसार आता एक जुलै मध्यरात्री बारा वाजल्यापासून राज्यातील वाहतूक व्यवसायिकाच्या ३० संघटनांसह पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रवासी व मालवाहतूक व्यवसायिकदार स्व – इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलनात करणार आहेत.





