लिपिक, विभागप्रमुखांच्या कामकाजाबाबत सेवानिवृत्तांच्या तक्रारी वाढल्या
पिंपरी : महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचार्यांच्या संबंधित विभागप्रमुख व लिपिकांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येऊ लागल्या आहेत. या प्रकाराला कंटाळून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंवर 2025 या कालावधीत सेवानिवृत्त होणार्या अधिकारी व कर्मचार्यांची नाव व पदनामासह यादी जाहीर केली आहे. निदान या निमित्ताने तरी या कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन मिळून अन्य लाभ मिळतील, हा हेतू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरून नियत वयोमनानुसार दरमहा सरासरी 25 ते 30 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. तर अनेक जण स्वेच्छानिवृत्तीदेखील घेत असतात. सेवानिवृत्त होणारे व स्वेच्छानिवृत्ती स्विकारणार्या अधिकारी व कर्मचार्यांची माहिती संकलीत करून, त्यांच्याकडे कर्जाची रक्कम बाकी आहे का? अन्य कोणती कारवाई प्रलंबित आहे का? याशिवाय लागू केली जाणारी पेन्शन व अन्य लाभांबाबतची माहिती संबंधित विभागप्रमुख व लिपिकांकडून प्रशासनाला वेळेवर मिळणे अभिप्रेत आहे. मात्र, या कामकाजाला फाटा देत संबंधित विभागप्रमुख व लिपिकाकडून अशा कर्मचार्यांची माहिती वेळेवर दिली जात नाही. याबाबत सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचार्यांकडून प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकारामुळे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लगतो.
हेही वाचा – बीडीपी समस्या सोडण्यासाठी धोरण: राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
दरम्यान, प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करता अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांसह लिपिकांना याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या सहा महिने अगोदरपासूनच त्या कर्मचार्याशी संबंधित कागदपत्रांची पूर्ताता करण्याचे काम हाती घ्यावे. सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांकडे सर्व ना -हरकत दाखले, (जसे की घरबांधणी कर्ज, घरदुरुस्ती, संगणक कर्ज, वाहन कर्ज, कामगार कल्याणनिधी कर्जपिंपरी चिंचवड मनपा सेवकांची सहकारी पतसंस्था दाखला, वैद्यकीय अग्रीम दाखला. विनावेतनी दाखला तसेच सद्यस्थितीत कोणत्या प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू अथवा प्रस्तावित आहे का? याबाबत विभागप्रमुखाची शिफारस या सर्व दाखल्याच्या सत्यप्रतीसह विभागप्रमुखांचे स्वयंस्पष्ट शिफारशसिह पकरण सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावे.
स्वेच्छानिवृत्ती अथवा राजीामा देणार्या कर्मचार्याचा मूळ अर्ज सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा. संबंधित लिपिकाची बदली झाल्यास त्याच्या जागी येणार्या लिपिकाने मूल लिपिकाशी संपर्क ठेवून हे कामकाज पार पाडावे. सेवानिवृत्तांना वेळेत पेन्शनसह अन्य लाभ मिळतील, याची खबरदारी घ्यावी, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या तक्रारी येऊ नयेत, याकरिता अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचार्यांची यादीच जाहीर केली आहे. त्यानुसार आता कामकाज करावे, अशा सूचना केल्या आहेत.