Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी “कोडिंग समर कॅम्प” उत्साहात संपन्न

८० विद्यार्थ्यांनी सादर केल्या तंत्रज्ञानातील नवकल्पना

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ (एलएफई) संस्थेच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या महिनाभराच्या ‘कोडिंग समर कॅम्प’चा समारोप गुरुवारी ५ जून रोजी उत्साहात झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ८० शाळकरी विद्यार्थ्यांना कोडिंग, तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेच्या जोरावर समस्येचे निराकरण या महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये सक्षम करण्यात आले.

पाच आठवड्यांच्या आणि एकूण ४५ तासांच्या या सत्रात इयत्ता ३ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘स्क्रॅच’ या ब्लॉक आधारित कोडिंग प्लॅटफॉर्मद्वारे कोडिंगचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. यामध्ये गेम्स आणि स्टोरी डिझाईन तसेच सर्किट्स, एलईडी आणि सेन्सर्स यांद्वारे फिजिकल कम्प्युटिंगचा अनुभवही विद्यार्थ्यांना मिळाला.

हे शिबिर दर आठवड्याला तीन दिवस चिंचवड येथील ऑटो क्लस्टरजवळील सायन्स पार्कमध्ये आयोजित करण्यात आले. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला होता, तर खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले होते.

हेही वाचा   :   बचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटप

या शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या रंगतदार हॅकाथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या गोष्टींद्वारे इंटरअॅक्टिव्ह गेम्स, डिजिटल स्टोरीज आणि हार्डवेअर प्रोटोटाईप्स सादर केले.

यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले,”हे शिबिर केवळ कोडिंग शिकवण्यासाठी नव्हते, तर मुलांच्या भविष्यासाठी विविध संधींची नवीन दारे उघडण्यासाठी होते. संगणकीय विचारशक्ती आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी, जिज्ञासू आणि सर्जनशील नागरिक बनवण्यासाठी महापालिका विविध उपक्रमांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे.

या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर नियमितपणे शहरात विविध ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी केली.

आम्ही बोपोडीहून रोज बसने आणि मग रिक्षाने या शिबिरासाठी येत होतो. पण दररोज एवढे अंतर पार करून येणे आमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरले. सर्व शिक्षकांनी खूप प्रेमाने आणि नवनवीन पद्धतीने मुलांना शिकविले. आता आमच्या मुलांचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. मोबाईल म्हणजे केवळ टाईमपास किंवा गेम खेळण्यासाठी वापरली जाणार गोष्ट नाही, तर कोडिंगसारखी गोष्टसुद्धा त्यातून शिकता येते. शिवाय ती कठीण नाही तर मजेशीर आहे हे मुलांना आता कळू लागलं आहे.

– देवता कांबळे, एक पालक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button