नागरिकांनो…पाण्याचा वापर काटकसरीने करा!

वडगाव मावळ : यावर्षी कडक उन्हाळा असूनही सुमारे शंभर दिवस पुरेल एवढा पाणीसाठा मावळ तालुक्यातील पवना, वडिवळे आणि आंद्रा धरणात असून या पाण्याचा वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यात पवना, वडिवळे आणि आंद्रा ही महत्त्वाची शासकीय धरणे असून या धरणांमधून मावळ तालुक्यातील बहुतांशी गावांना पाणीपुरवठा होतो. तर पवना धरणातून तळेगाव दाभाडे नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंटबोर्ड आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी पाणी उपलब्ध होते. याशिवाय पवना खोऱ्यातील काही गावे व शेतीसाठी या धरणातील पाणी वापरले जाते.
गतवर्षी झालेल्या पावसाळ्यामध्ये तीनही धरणे शंभर टक्के भरली होती. त्यातील पवना धरणामध्ये सध्या ४४.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १०८.२१ दशलक्ष घनमीटर इतका सध्या असल्याचे सहायक अभियंता सचिन गाडे यांनी सांगितले. तर हा पाणीसाठा दि १५ जुलै २०२५ पर्यंत पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यातील वडिवळे धरणात ६२.२ टक्के इतका पाणीसाठा आजमितीला असून तो २९.३३ दशलक्ष घनमीटर असल्याचे वडिवळे पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता संतोष शिंदे यांनी सांगितले. हाही पाणीसाठा ह्या खोऱ्यातील लाभार्थ्यांना दिनांक १५ जुलै २०२५ पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. या खोऱ्यात कामशेत, कान्हे, टाकवे, पारवडी, वडगाव, जांभूळ, तळेगाव, सांगवी, वारंगवाडी, कातवी, आंबी, नाणोली, वराळे, इंदोरी तसेच देहू, आळंदी ते मरकळ पर्यंत शेती व पिण्याच्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो, असे शिंदे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील आंद्रा हे तिसरे महत्त्वाचे शासकीय धरण असून या धरणात सध्या ४७.५० टक्के पाणीसाठा आहे. तो पाणीसाठा ४०.८५ दशलक्ष घनमीटर असल्याचे वडगाव मावळ पाटबंधारे शाखा अभियंता माणिक शिंदे यांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
दिवसेंदिवस कडक उन्हाळा वाढत चालला आहे. त्यामुळे बाष्पीभवनही जास्त होत आहे तसेच कडक उन्हामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाण्याचा वापर वाढत चालला आहे. नागरिकांनी उपलब्ध आहे ते पाणी जपून वापरण्यासाठी काळजी घ्यावी.
– सचिन गाडे, सहायक अभियंता
मावळ तालुक्यात पवना, वडिवळे आणि आंद्रा या धरणासह कासारसाई, पाचाणे, आढले, मळवंडी ठुले, जाधववाडी या ठिकाणी देखील छोटी धरणे असून त्यामध्ये देखील जुलै महिन्यापर्यंत पुरेल असे पाणीसाठयाचे नियोजन केले आहे. फक्त लाभार्थी नागरिकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा.
– आर. बी. गव्हाणकर, अभियंता श्रेणी १