“फुटबॅाल खेळतात तसा लाथा बुक्क्यांनी त्याला मारला”; बारामतीतील त्या घटनेवर अजित पवार भडकले, म्हणाले आता असले प्रकार….

Ajit Pawar : बारामतीमधील एका हॅाटेल मॅनेजरला काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलची व्हायरल झाली असून, या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी या घटनेवर भाष्य करत असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
बारामती येथील एका हॅाटेलमध्ये हॅाटेल मॅनेजर काउंटवर बसला असताना अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्यास मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर त्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्यांनी हॅाटेलबाहेर ओढत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. फुटबॅाल कसा खेळाला जातो तसा ते लाथा बुक्क्या मारत चालले होते. मी पोलिसांना सांगितलं अजित पवाराच्या जवळचा कार्यकर्ता किंवा कोणीही असलं त्याच्या मुलानी जर असलं काही केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही. असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या
त्याच्यावर अशी काही गुन्हे लागतील की ते सतत अशे गुन्हे करत राहिले तर पुढे मोकका पण लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तर मेहरबानी करा कोणीही कायदा हातात घेऊ नका, कोणी काही चुकीच केलं तर पोलिसांकडून येऊन तक्रार करा असे आवाहन त्यांनी केलं. १४ तारेखेला घटनेचे शिल्पकार डॅा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाची ७५ वर्ष पूर्ण झाली आहे, तरी काहीकाही जण स्वतःच्या घरीची मालमत्ता असल्यासारखं एखाद्याला बदडून काढत आहेत. हे होता कामा नये. असे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
तुमची मुलं काय करताहेत कुठं चुका करताहेत हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबादारी पालकांनी पार पाडवी मग मला मुंबईला फोन येतात. दादा चुकलं एकदा पोटात घ्या. आरं पोट फुटायला लागलं आणि काय म्हणतो पोटात घ्या, अशी मुश्किल टिपण्णी देखील अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा काही शरम काही कशी वाटत नाही. एवढं त्याला बेदम मारलं. यामुळे शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही, असे देखील ते म्हणाले.