सांगवीत भगवान श्रीकृष्णांना ५६ भोग अर्पण करून अन्नकूट महोत्सव साजरा
महेश मंडळ सांगवीतर्फे स्नेहमिलन व अन्नकूट उत्सवाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरातील महेश मंडळ यांच्या वतीने दीपावली स्नेहमिलन सोहळा व अन्नकूट महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिरात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णांच्या महाआरतीने झाली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर परिसर श्रीकृष्ण नामस्मरण, आरत्या आणि भक्तिगीतांनी दुमदुमून गेला होता. यावेळी बोलताना सतीश लोहिया म्हणाले पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळवासीयांना सांगितले की, आपण इंद्रदेवाऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण हाच पर्वत आपल्या गायांसाठी चारा आणि जीवनदायी साधन उपलब्ध करून देतो. यामुळे इंद्रदेव रुष्ट होऊन गोकुळावर मुसळधार पाऊस पाडू लागले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करांगळीवर सात दिवस उचलून गोकुळाची रक्षा केली.या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी अन्नकूट महोत्सव साजरा करण्याची आणि भगवानाला ५६ भोग अर्पण करण्याची परंपरा आजही चालू आहे.
हेही वाचा : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर; क्षणार्धात आगीचा गोळा
या वेळो सतीश लोहिया, निलेश अटल, मधुसूदन भाला, गौरी नावंदर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज अटल यांनी केले, तर आयोजन यशस्वी होण्यासाठी मुकुंद तापडिया, विवेक गजानंद बिहानी, कुलदीप बजाज, आदींनी परिश्रम घेतले.
मंदिर परिसरात दिव्यांच्या प्रकाशात, श्रीकृष्ण नामस्मरणाच्या गजरात आणि भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात अन्नकूट महोत्सव उत्साहात पार पडला.




