लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर; क्षणार्धात आगीचा गोळा

नवी दिल्ली | १० नोव्हेंबर (सोमवार) सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वीचा क्षण स्पष्टपणे दिसत असून, त्या व्हिडीओने सर्वत्र खळबळ उडवली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्यासमोरील मेट्रो स्थानकाजवळचा भाग दिसतो. सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची तीव्र वाहतूक कोंडी दिसते. या गर्दीत पांढऱ्या रंगाची आय20 कार शांतपणे उभी असते. काही सेकंदांतच अचानक ती कार आगीत गुरफटते आणि एक मोठा स्फोट होतो. क्षणार्धात परिसरात धूर आणि भीतीचे वातावरण निर्माण होते.
हेही वाचा : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’! वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघ अध्यक्षांची निर्घृण हत्या
NIA कडे तपास सुपूर्द
या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ परिसर सील करून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ला तपासाची जबाबदारी दिली आहे. प्राथमिक तपासात हा दहशतवादी कट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडेच उध्वस्त करण्यात आलेल्या “पांढरपेशी दहशतवादी मॉड्यूल” मध्ये अटक झालेल्या डॉ. मुझम्मील गनी या संशयिताने जानेवारी महिन्यात लाल किल्ला परिसराला वारंवार भेट दिली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
सात जणांना अटक
लाल किल्ला स्फोट प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. मुझम्मील अहमद गनी, डॉ. अदील रादर, मोलवी इरफान अहमद, आरिफ निसार दार, यासिर-उल-अश्रफ, मकसूद अहमद दार आणि जमीर अहमद अहंगर यांना अटक झाली आहे.




