Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ओल्या कचऱ्याची जबरदस्ती चालणार नाही’ ; आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा फेडरेशनचा इशारा

सोसायट्यांवर अन्यायकारक निर्णय लादू नका ; बिल्डरांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन – संजीवन सांगळे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 च्या आधारे १०० किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकाला चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत आयोजित बैठकीत फेडरेशनने हा निर्णय अन्यायकारक, अव्यवहार्य आणि सोसायट्यांवर लादलेला असल्याचे ठामपणे मांडत प्रशासनाला धारेवर धरले.

महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. जंगम, उपायुक्त (आरोग्य) श्री. ठेंगल, शहर अभियंता श्री.बागवानी यांच्यासह चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, पुणे जिल्हा फेडरेशनचे पदाधिकारी तसेच विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत फेडरेशनने स्पष्ट भूमिका घेताना सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ पासून अस्तित्वात असतानाही १०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रकल्पांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारणे ही बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी होती.मात्र ती व्यवस्था नसतानाही संबंधित प्रकल्पांना पूर्णत्व प्रमाणपत्रे कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संबंधित बिल्डरांवर कारवाई करून त्यांच्याकडून आवश्यक सुविधा उभारून घेतल्यानंतरच सोसायट्यांवर कोणतीही जबाबदारी टाकावी, अशी मागणी फेडरेशनने केली.

हेही वाचा –  संरक्षण क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! उत्पादन 1.78 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर, निर्यातही वाढली

याशिवाय बहुतांश सोसायट्यांमध्ये जागेचा अभाव, मोठा आर्थिक भार, दुर्गंधी व स्वच्छतेच्या समस्या तसेच प्रक्रिया झालेल्या खताची विल्हेवाट लावण्याबाबत कोणतीही स्पष्ट यंत्रणा नसल्याचेही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पासाठी करसवलत किंवा आर्थिक अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली.

बैठकीत अनेक सोसायटी प्रतिनिधींनी इंदूर शहराच्या धर्तीवर ओल्या कचऱ्याचे संकलन व प्रक्रिया ही जबाबदारी महानगरपालिकेनेच पार पाडावी,अशी भूमिका मांडली. त्यावर अतिरिक्त आयुक्तांनी सर्व बाबींचा सखोल विचार करून तज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आजच्या बैठकीत आम्ही सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करताना येणाऱ्या सर्व अडचणी, बिल्डरांकडून झालेल्या त्रुटी आणि आर्थिक भार याविषयी प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली. या सर्व समस्या निकाली निघेपर्यंत महापालिकेने कोणतीही सक्ती करू नये. अन्यथा फेडरेशन त्याला तीव्र विरोध करेल. आणि जर तोडगा न काढता महापालिकेने ओला कचरा उचलणे बंद केले, तर तोच ओला कचरा आयुक्तांच्या दालनात टाकून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

— संजीवन सांगळे
अध्यक्ष,चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button