मिशन- PCMC: माजी आमदार विलास लांडे यांना महापालिका रणसंग्रामात ‘‘साईडरोल’’ ?
शहराच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता; पण योगेश बहल यांच्या लेखी ‘‘समन्वयक’’ची जबाबदारी!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लेखी केवळ ‘‘समन्वयक’’ झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीत भाजपासोबत दोन हात करण्याची तयार राष्ट्रवादी करीत आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर ‘प्रभावशाली चेहरा’ म्हणून लांडे यांना मैदानात उतरवण्याची आवश्यकता आहे. पण, शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये ‘‘मुख्य समन्वयक’’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे महापालिका रणसंग्रामात ताकदीचा योद्धा असलेले विलास लांडे ‘‘साईडरोल’’ च्या भूमिकेत दिसणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग रचना झाली. त्यानंतर मंगळवारी आरक्षण सोडत झाली. महापालिका निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी तगडी फाईट होईल, असे चित्र आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन आणि सक्रीयता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी घाईघाईत पक्षाची जंबो शहर कार्यकारीणी जाहीर केली. त्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांची अनुपस्थिती जाणवली. विशेष म्हणजे, विलास लांडे नाराज आहेत का? अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
शहराच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि मुत्सद्दी नेता म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. नगरसेवकपदापासून अगदी महापौर, आमदारपदापर्यंतची कारकीर्द त्यांनी गाजवली आहे. किंबहुना, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात त्यांनी यापूर्वी कामही केले आहे.
‘‘शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट युती होवू शकते. त्यासाठीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील…’’ असा दावा योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत केला. किंबहुना, ‘‘शरद पवार आमचे श्रद्धास्थान आहेत आणि अजित पवार आमचे स्फूर्तीस्थान आहेत…’’ असेही बहल बोलते झाले. त्यामुळे राजकीय ताकद वाढवण्याठी राष्ट्रवादी+ राष्ट्रवादी या सूत्राची चर्चा सुरू आहे. मात्र, ज्यांच्या घरातील देव्हाऱ्यात शरद पवारांचा फोटो आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. त्यावेळीच विलास लांडे यांनी सुरूवातीपासून शरद पवारांबाबत असलेली आत्मियता जाहीरपणे बोलून दाखवली होती. आता आज जी भूमिका बहल मांडत आहेत किंवा शरद पवार गटाची साथ घ्यावी, असे अजित पवार गटाच्या लोकांना वाटते. हा प्रयोग माजी आमदार विलास लांडे यांनी विधानसभा निवडणूक- 2024 मध्येच करुन दाखवला होता. भोसरी विधानसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादी एकच झाल्या होत्या. ती किमया विलास लांडे यांनी केली होती. पण, दुर्दैवाने हा प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र, भाजपाला घाम फुटला होता, याचा विसर शहरातील राष्ट्रवादीच्या ‘‘कारभाऱ्यांना’’ पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
तसेच, एकेकाळी शहराच्या राजकारणातील ‘हिरो’ म्हणून दबंग कामगिरी करणारे माजी आमदार विलास लांडे आता ‘साईड रोल’ करणार आहेत की, पक्षातील अतिमहत्त्वाकांक्षी लोकांमुळे निवृत्तीचा प्रवास सुरू करणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडे स्थानिक पातळीवर प्रभावी चेहरा हवा…
भारतीय जनता पार्टीकडून स्थानिक पातळीवर आमदार शंकर जगताप यांना ‘जिल्हा निवडणूक प्रमुख’ पदाची, तर आमदार महेश लांडगे यांच्यावर उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. पण, राष्ट्रवादीचा सर्व खेळ केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. वास्तविक, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीने शहराचे नेतृत्व करु शकेल, अशा प्रभावी नेत्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवले पाहिजे. कारण, ‘‘अजितदादा आले की सुसाट… आणि गेले की सपाट…’’ अशी राष्ट्रवादीची स्थिती आहे. दुसरीकडे, चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघात मोठा जनसंपर्क आणि परिचित असलेले माजी आमदार विलास लांडे भाजपाचे जगताप-लांडगे यांना तोडीस-तोड आव्हान देवू शकतात. तसेच, जुन्या आणि नव्यांचा मेळ घालून भाजपा विरोधाची मोट बांधू शकतात. त्या अनुशंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलास लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी द्यायला हवी होती. विशेष म्हणजे, मावळात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ‘‘महायुती’’ म्हणून लढण्याची घोषणा केली. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये वेळ पडलीच, तर मावळातील ‘‘मामा-भाचे पॅटर्न’’ शहरात यशस्वी करण्याची धमक विलास लांडे यांच्याकडे आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





