गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करणारा अर्थसंकल्प : सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके
पिंपरी । प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. प्रामुख्याने हा अर्थसंकल्प महिला, शेतकरी, सर्वसामान्य आणि तरुणांना सर्वाधिक फायदा देणारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक पायाभूत सुविधा बळकट करणे आणि लसीकरणच्या कार्यक्रमाला गती देणेत आली आहे.
आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने तरुणांना नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी पाऊल उचललेले दिसून येत आहे. शेतकऱ्यांना डिजीटल सेवा देण्याबरोबरच त्यांना गाव, तहसील पातळीवर व्यवसाय निर्मितीला चालना दिलेली आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नविन ८० लाख घरे बांधण्यासाठी भरीव तरतुद केली आहे. त्याचप्रमाणे पहाडी व दुर्गम क्षेत्रांमध्ये नविन रस्ते निर्मिती करुन त्या भागातील दळणवळण शहरांशी जलदगतीने जोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद केलेली आहे.
पर्यावरण, वायु प्रदुषण, वेस्ट टु एनर्जी या सारख्या प्रकल्पांना चालना देवुन प्राधान्य दिलेले आहे. देशातील शोषित, पिडीत, उपेक्षित, वंचित गरीब कामगार व शेतकरी या घटकांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. एकुणच या अर्थसंकल्पात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विशेष नियोजन केल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतिक्रीया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.





