पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस; एकावर कोयत्याने वार
संपुर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद; पाहा व्हिडीओ

पिंपरी : शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरीतील अशोक थिएटरच्या मागे असलेल्या मेडीमार्ट या मेडिकल दुकानामध्ये शिरून सहाजणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार केले. तसेच पिंपरीतील कामगार नगर येथेदेखील सात ते आठ वाहनांची कोयत्याने तोडफोड केल्याचे समोर आले. याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सहाजणांच्या टोळक्याने २४ तास सुरू असणाऱ्या मेडिकल दुकानामध्ये शिरून एकावर कोयत्याने वार केले. या घटनेत मेडिकलमध्ये काम करणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मेडिकलमधून बाहेर पडताना टोळक्याने कोयत्याने काउंटरच्या काचा फोडत धुडगूस घातला. या घटनेमुळे पिंपरीत व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. पुन्हा एकदा कोयता गॅंगची चर्चा सुरू झाली आहे. तसेच याच गँगने मध्यरात्री सात ते आठ वाहनांची तोडफोड केली आहे.





