ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Big News : पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेविकेसह ४० जण दुबईत अडकले!
कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण : युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील विमानसेवा विस्कळीत
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह सुमारे ४० ज्येष्ठ नागरिकांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप सध्या दुबई येथे अडकला आहे. सांगवी परिसरातील गायकवाड कुटुंबातील सहा सदस्यांचाही या ग्रुपमध्ये समावेश आहे. अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील विमानसेवा विस्कळीत झाली असून, भारताकडे येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्रुप २५ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला रवाना झाला होता. नियोजित वेळापत्रकानुसार आज त्यांचे भारतात परतण्याचे ठरले होते. मात्र सुरक्षा कारणास्तव विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
सध्या सर्वजण सुरक्षित स्थळी थांबले असून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार काळजी घेत आहेत. तरीही दुबईवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने त्यांच्या आरोग्याबाबतही नातेवाईक काळजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकार यांनी विशेष विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरात लवकर सुरक्षित परतीची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





