श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

पुणे | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सोमवारी टपोऱ्या द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली. काळी, हिरवी आणि लाल अशा विविध रंगांच्या द्राक्षांनी गाभारा आणि सभामंडप सजवून मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. या अनोख्या आरासेला पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित या महोत्सवासाठी नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सुमारे दोन हजार किलो निर्यातक्षम व रसायनविरहित द्राक्षांचा वापर करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी तसेच सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : अमेरिकेचा इराणवर जबरदस्त हल्ला; IRGC मुख्यालय उद्ध्वस्त, VIDEO समोर
मंदिरातील गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपात द्राक्षांची देखणी सजावट करण्यात आली होती. द्राक्षांच्या हंगामात गेल्या काही वर्षांपासून मंदिरात अशा प्रकारची आरास केली जात असून, हा उपक्रम भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचा ठरत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आरासीनंतर ही द्राक्षे प्रसाद म्हणून भाविकांना वाटली जाणार असून अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयातही वितरित केली जाणार आहेत. श्रद्धा, कृषी आणि समाजसेवा यांचा संगम साधणारा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे. सह्याद्री फार्म्सला सुमारे २२ हजार शेतकरी जोडले गेले असून भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून तिची ओळख आहे. द्राक्षांच्या नव्या पेटंटेड वाणांचे उत्पादन करून कंपनी कृषी क्षेत्रातही वेगळी छाप पाडत आहे.




