अमेरिकेचा इराणवर जबरदस्त हल्ला; IRGC मुख्यालय उद्ध्वस्त, VIDEO समोर

US-Iran Conflict | मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून अमेरिकेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर (IRGC) च्या मुख्यालयावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या कारवाईचा व्हिडिओ अमेरिकन लष्कराने जारी केला असून, हल्ल्यात IRGC चे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सोशल मीडियावर पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली. CENTCOM च्या मते, गेल्या ४७ वर्षांत १,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी IRGC जबाबदार आहे. “अमेरिकेच्या मोठ्या हल्ल्यात नागाचा फणा ठेचण्यात आला. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आमच्याकडे आहे आणि आता IRGC कडे मुख्यालय उरलेले नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात
दरम्यान, इस्रायली लष्करानेही इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईत IRGC चे काही कमांड सेंटर, गुप्तचर विभागाची मुख्यालये, एअर फोर्स कमांड सेंटर आणि इतर सुरक्षा ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यांमुळे इराणच्या कमांड-अँड-कंट्रोल क्षमतेला मोठा धक्का बसल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तणाव अधिकच वाढला आहे. शनिवारी झालेल्या या घटनेनंतर रविवारीही अमेरिका आणि इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच होती.
इस्रायलने इराणच्या राजधानीवर लक्ष केंद्रीत करत हल्ले वाढवले, तर प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायल, आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळ, सौदी अरेबियाची राजधानी आणि दुबईवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.





