सावधान ! ‘महाकुंभ’च्या नावाखाली फसवणूक

पिंपरी : सनातन धर्मामध्ये महाकुंभ मेळाव्याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे होणार्या महाकुंभ मेळाव्यात कोट्यवधी भाविक सहभागी होतील; मात्र याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबले आहेत. बनावट वेबसाइट्स, खोटे कॉल्स आणि खोट्या बुकिंग सुविधांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
बनावट वेबसाइट्स :
महाकुंभसाठी खास डिझाइन केलेल्या, अधिकृत संकेतस्थळांशी मिळतीजुळती वेबसाइट तयार करून, नागरिकांना कमी किमतीत बुकिंग देण्याचे आश्वासन दिले जाते. पैसे भरल्यानंतर या वेबसाइट्स अचानक बंद केल्या जातात.
-थेट नागरिकांना कॉल करून ‘महाकुंभ विशेष ऑफर’ सांगितली जाते. यात कमी किमतीत राहण्याची सुविधा, प्रवास आणि इतर सुविधा देणार असल्याचे सांगून पैसे उकळले जातात.
-ई-मेल, ‘एसएमएस’ किंवा सोशल मीडियाद्वारे संशयास्पद लिंक पाठवून नागरिकांना फसवले जाते.
हेही वाचा – वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाकुंभसाठी प्रवास करणार्या नागरिकांना अधिकृत संकेतस्थळांवरूनच बुकिंग करण्याचा सल्ला दिला आहे. फसवणुकीसंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर किंवा cybercrime. gov. in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. कोट्यवधी लोक कुंभमेळ्यास हजेरी लावतात. या गर्दीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्याचे नवनवीन मार्ग शोधले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.





