क्रिडापिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीचे दुर्दैवी चित्र: यमुनानगर जलतरण तलावाची दुरावस्था!

नगरसेवक उत्तमराव केंदळे यांचा संताप : क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका

पिंपरी-चिंचवड: शहरातील क्रीडा सुविधांचा बोजवारा उडाल्याचे आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे यमुनानगर येथील कै. सौ. माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव. कागदोपत्री सुरू असलेला हा तलाव प्रत्यक्षात मात्र अस्वच्छता, अपुरी देखभाल आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे जलतरणपटूंसाठी धोकादायक ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया खेळाडू व नागरिक व्यक्त करत आहेत.

तलाव परिसरातील तुटलेली फरसबंदी, अस्वच्छ बदलाखोली, पाण्याच्या गुणवत्तेबाबत अनिश्चितता, फिल्ट्रेशन यंत्रणेतील बिघाड आणि वेळोवेळी बंद ठेवण्याची पद्धत — या सर्व बाबींमुळे नियमित सराव करणाऱ्या जलतरणपटूंना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सकाळ-संध्याकाळ सरावासाठी येणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे खेळाडू यांचा हिरमोड होत आहे.

महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून तलाव सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात सुविधा अपुऱ्या आणि दर्जाहीन असल्याने तो नावापुरताच सुरू असल्याचा आरोप होत आहे. अनेकदा अचानक दुरुस्तीच्या कारणावरून प्रवेश बंद केला जातो; परंतु दुरुस्तीची कामे नेमकी कोणती, किती काळ चालणार, याबाबत पारदर्शक माहिती दिली जात नाही.

१३ तलावांची घोषणा; प्रत्यक्षात बंदच अधिक

पालिकेने शहरात १३ जलतरण तलाव उभारल्याचा दावा केला असला, तरी अनेक तलाव दीर्घकाळापासून बंद आहेत. काही ठिकाणी स्थापत्यविषयक कामांच्या नावाखाली दोन-दोन वर्षे कुलूप लावले आहे. यामुळे शहरातील जलतरण संस्कृतीला मोठा धक्का बसत आहे. खेळाडूंना खासगी तलावांचा पर्याय स्वीकारावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची मागणी…

करदाते नागरिकांचा थेट प्रश्न आहे — “कररुपी कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेले तलाव जर वापरासाठीच उपलब्ध नसतील, तर त्याचा उपयोग काय?” खेळाडूंनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तलावांची तात्काळ दुरुस्ती करून नियमित व सुरक्षित सेवा सुरू केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी व अहवाल सार्वजनिक करावा. फिल्ट्रेशन व यांत्रिक यंत्रणेची त्वरित दुरुस्ती करावी. स्वच्छता व सुरक्षा मानके काटेकोरपणे पाळावीत. वेळापत्रक व बंद/दुरुस्ती संदर्भातील माहिती अधिकृतपणे जाहीर करावी. शहराच्या क्रीडा विकासाचे मोठे दावे करणाऱ्या प्रशासनाने आता कृतीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे. अन्यथा, क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार आणि क्रीडा स्थापत्य विभागाचा वेळकाढूपणा शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरत राहील, यात शंका नाही.

“करदात्यांच्या पैशातून उभारलेले जलतरण तलाव जर खेळाडूंनाच उपलब्ध नसतील, तर हा सरळसरळ प्रशासनाचा अपयश आहे. यमुनानगर येथील तलावाची अवस्था अत्यंत दयनीय असून, क्रीडा विभागाचा हलगर्जीपणा आता सहन केला जाणार नाही. पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा या बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळत असताना केवळ कागदोपत्री ‘तलाव सुरू’ असल्याचे दाखवणे ही जनतेची दिशाभूल आहे. तात्काळ दुरुस्ती करून तलाव पूर्ण क्षमतेने सुरू करावा; अन्यथा स्थानिक नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
– प्रा. उत्तमराव केंदळे, नगरसेवक, यमुनानगर. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button