नागरिकांच्या आंदोलनानंतर वाकड मधील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय

पिंपरी : वाढत्या हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने वाकड, ताथवडे परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वाकडमधील भूमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा (एअर प्युरिफिकेशन) उभारण्यात येणार आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेसाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या वाकड, पुनावळे, ताथवडे भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना कच्चा माल पुरविणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे परिसरातील हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हवेची गुणवत्ता ढासळली आहे. वाढत्या हवा प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाकड, ताथवडे आणि मारुंजी परिसरातील नागरिकांनी मूकमोर्चा काढला होता. या परिसरातील हवा शुद्धीकरणासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंधराव्या वित्त आयोगातर्गत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरांना हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा – भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत महिनाभरात निर्णय
सोशल अल्फा ही सामाजिक संस्था हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यंत्रणा बसवते. यापूर्वी या संस्थेने बंगळुरू आणि दिल्ली येथे काम केले आहे. जानेवारी महिन्यामध्ये संबंधित संस्थेने पर्यावरण विभागामध्ये सादरीकरण केले आहे. या सादरीकरणामध्ये त्यांनी शहरात हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी लागणारा खर्च व ठिकाण याबाबत विचारणा केली. त्यांना पर्यावरण विभागामार्फत सहमती देण्यात आली आहे. सोशल अल्फा, पंजुरी प्रयोगशाळा, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. यासाठी महापालिका २५ टक्के म्हणजेच आठ लाख ५० हजार रुपये खर्च देणार आहे. जानेवारी २०२६ नंतर देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी दोन लाख २५ हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
वाकड परिसरात मोठ्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. प्रदूषण पातळी वाढली आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा बाहेरील अशुद्ध हवा खेचून घेईल. ती हवा शुद्ध करून बाहेर सोडेल. त्यामुळे या परिसरातील प्रदूषणात घट होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. महिन्याभरात काम पूर्ण होईल. त्यामुळे वाकड परिसरातील प्रदूषण कमी होईल, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.