‘ड्रग्ज विक्री प्रकरणातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव’; पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विळखा वाढत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. यावेळी पोलीस दलाला ड्रग्जबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. राज्यासह जिल्ह्यातही ड्रग्जचा विळखा वाढत आहे. तरुण पिढी यात मोठ्या प्रमाणात गुरफटत असल्याचे दिसून येत आहे.
ड्रग्जविरोधात पोलीस दलाने तीव्र मोहीम राबवावी. यात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून, यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा – वाहनांचा अतिवेग पादचाऱ्यांचा जिवावर, अनेक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ नसल्याने आरोपी शोधण्यात अडचणी
ते म्हणाले की, जिल्ह्यात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. यातील १६ कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते. २० ते ३० हजार रुपये थकलेल्यांना वसुलीसाठी रात्री अपरात्री प्रत्यक्ष जावून किंवा फोन करुन त्रास दिला जात आहे. यातील १६ कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते.
२० ते ३० हजार रुपये थकलेल्यांना वसुलीसाठी रात्री अपरात्री प्रत्यक्ष जावून किंवा फोन करुन त्रास देण्याचे काम या कंपन्यांकडून होत आहे. यापुढे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच वसुली करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. या मायक्रो फायनान्सबाबत ३ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देखील पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.