भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत महिनाभरात निर्णय

पिंपरी : भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत येत्या महिनाभरात निर्णय अपेक्षित मानला जात आहे. पहिल्या टप्प्यात बूथ समिती आणि 14 मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर शहराध्यक्ष पदासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. भाजपमध्ये सध्या आमदार शंकर जगताप यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची धुरा आहे. दरम्यान, पक्षामध्ये सध्या शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू आहेत.
या पदासाठी पक्षात अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. तथापि, विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत शंकर जगताप यांना निवडणूक प्रचारामुळे पक्ष संघटना बांधणीसाठी वेळ देता येणार नसल्याने संघटनात्मक बदलाचा एक भाग म्हणून प्रदेश स्तरावरुन भाजप शहर कार्यकारी अध्यक्ष म्हणून शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली होती.
हेही वाचा – गुढी पाडवा शोभा यात्रेत हजारो हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार महिने उलटल्यानंतरही अद्याप भाजपमध्ये शहराध्यक्ष बदलाबाबत निर्णय झालेला नाही. दरम्यान, सध्या शहर भाजपमध्ये पुढील महिनाभरात बूथ समिती अध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होईल.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
भाजप हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सध्या पक्षामध्ये बूथ समिती अध्यक्ष आणि मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील महिनाभरात शहराध्यक्षपदाबाबत निर्णय होईल.
– आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप
भाजपच्या बूथ समित्या आणि मंडल अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर शहराध्यक्ष पदाबाबत प्रदेशस्तरावरून निर्णय होईल. त्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. संघटनात्मक निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडला जाईल.
– शत्रुघ्न काटे, शहर कार्यकारी अध्यक्ष, भाजप