चोरीच्या आठ घटनांमध्ये 4 लाख 16 हजारांचा ऐवज चोरीला

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी रविवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व घटनांमध्ये एकूण चार लाख 16 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
देहूरोड, चिखली आणि भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. देहूरोड येथून 86 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी अमीर आयुब आत्तार (वय 30, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. तर सुधीर अरुण खरात (वय 24, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरात यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक सिलेंडरची टाकी, पितळी बर्नर असा एकूण एक लाख 30 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सुशील शिवराम संगापुरे (वय 35, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरातून सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम असा एकूण 48 हजारांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.
चिंचवड, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे येथे वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. चिंचवड मधून 25 हजारांची, देहूरोड येथून 14 हजारांची, तळेगाव दाभाडे येथून 23 हजारांची दुचाकी आणि मोबाईल फोन चोरीला गेला आहे.
पिंपरी येथे लोटस कोर्ट महिंद्रा रॉयल कमर्शियल शाॅप समोरून गटारावर लावलेली दहा हजारांची लोखंडी प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार दत्तात्रय देसाई (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देसाई यांच्या घरातून 90 हजार 200 रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि तीन लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेले आहेत.