मिशन-PCMC: लोकांचा विश्वास पुन्हा मिळवणार अन् पिंपरी-चिंचवडमध्ये बदल घडवणार!
शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा विश्वास : पुण्यात शरद पवार यांची घेतली भेट
पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मोदीबाग, पुणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
या चर्चेत पवार साहेबांनी पक्षाची संघटनशक्ती वाढवणे, जनतेपर्यंत थेट पोहोचणाऱ्या उपक्रमांना गती देणे, तसेच आगामी निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. शहरातील तरुण कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. भाजपासमोर प्रभावी आव्हान निर्माण करण्यासाठी दोन्ही गट एकत्र येतात की महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच शहरातील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीबाबत तीन बैठकांनंतरही पक्षश्रेष्ठींनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपासोबत दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या ‘तुतारी’ स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने काम करत आहे. तरीही राजकीय निरीक्षकांचा अंदाज असा आहे की महाविकास आघाडी होईल आणि भाजपाला मोठे आव्हान दिले जाईल. कामठे यांच्या सोबत युवक शहराध्यक्ष इम्रान शेखही उपस्थित होते. या भेटीमुळे आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे नियोजन अधिक स्पष्ट आणि गतीमान होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
“शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन हे आमच्यासाठी ऊर्जादायी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ठोस बदल घडवण्यासाठी आणि लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात ही निवडणूक लढवणार आहोत. पिंपरी-चिंचवडमधील जनता निश्चितपणे बदल घडवेल, असा विश्वास आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट.





