‘मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद’; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

मुंबई | मुस्लिम बांधवांच्या आगामी ‘बकरी ईद’ सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई व परिसरातील काही गृहसंकुलांमध्ये (Housing Societies) आणि सार्वजनिक ठिकाणी सणासाठी बकऱ्या आणण्यास भाजप आणि काही स्थानिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवल्याने मीरा रोड, घाटकोपर, गोरेगाव या भागांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI-A) प्रमुख रामदास आठवले यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि परखड वक्तव्य केले आहे.
बुधवारी पालघर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी, “भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाची नव्हे, तर आपलीच अवलाद आहेत,” असे म्हणत राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावना न भडकवण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले आहे.
मीरा रोड येथील गृहसंकुलांमध्ये झालेल्या वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मुस्लिम समाजाने जर सणासाठी बकऱ्या आणल्या असतील, तर त्याला लगेच विरोध करण्याची गरज नाही. मुघल भारतात येण्यापूर्वी येथील सर्व मुस्लिम बांधव हे हिंदूच होते. मुघल शासक भारतात आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलीच (हिंदूंची) अवलाद आहेत.”
हेही वाचा
इतिहासाचा संदर्भ देत आठवले पुढे म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र राहत होते. त्यामुळे केवळ राजकीय स्वाार्थासाठी कोणीही समाजा-समाजांमध्ये धार्मिक भावना भडकवू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा इतर कोणी, अशा पद्धतीने सणांच्या काळात कोणालाही विरोध केला जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
संविधानाचा आदर राखण्याचे आवाहन
रामदास आठवले यांनी सामाजिक सलोखा राखण्यावर भर देत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “भारताचे संविधान सर्वांसाठी समान आहे. संविधानाला छेद देणारे किंवा त्याला बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य कोणाकडूनही घडता कामा नये. आपल्या देशात प्रत्येकाला आपापले सण शांततेत साजरे करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचणार नाही, याची काळजी समाजातील प्रत्येक घटकाने घेतली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी या वेळी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.





