स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरूवात

- पं. उल्हास कशाळकर यांचा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव’ पुरस्काराने गौरव
- मंदार प्रभुणे यांना पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवा’ला आजपासून सुरुवात झाली. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २७ अ, सिटीप्राईड शाळेलगत व भेळ चौका जवळ महोत्सव सुरु असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
महापौर व महोत्सवाचे स्वागताध्यक्ष राहुल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक व महोत्सवाचे मुख्य सल्लागार महेश काळे, महोत्सवाचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई, पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गालिंदे, शरयू प्रतिष्ठानचे नितीन ढमाले, अभिजित भालेकर, येस बँकेचे समीर कुलकर्णी, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात झाली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संगीत सेवेसाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार ग्वाल्हेर, जयपूर-आग्रा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात आला. रोख रुपये ५१ हजार, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याबरोबरच यावर्षी पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार आश्वासक तबलावादक मंदार प्रभुणे यांना प्रदान करण्यात आला. रोख ११ हजार, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच, यावेळी दिवंगत अभिनेत्री व निवेदिका सरोज गणेश राव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विशेष मानपत्र प्रदान करीत आले.

या आधी सुप्रसिद्ध पखावज वादक पं. भवानीशंकर यांनी आपल्या पखावज वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी यावेळी उपस्थित रसिकांशी देखील संवाद साधला. त्यांना उमा शंकर (गायन) आणि संगीत मिश्रा (सारंगी) यांनी साथसंगत केली. उद्या शुक्रवार (दि. १) व शनिवार (दि. २) सायं साडेसहा वाजल्यापासून हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. या महोत्सवात नृत्य, फ्युजन या कलांचा आविष्कार रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार असल्याची माहिती यावेळी महेश काळे यांनी दिली. आनंद देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





