रिक्षा चालकांचा व्यवसाय वाचवा
महाराष्ट्र रिक्षा पंचायतिची मागणी; नवीन परिवहन आयुक्तांचे अभिनव पद्धतीने स्वागत
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. रिक्षा चालवल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही. सध्या रिक्षाचे हप्ते कसे भरायचे यात फायनान्स कंपनीच्या गुंडांचा वसुलीसाठी होणारा सततचा त्रास आहे. त्यामुळे चांगले निर्णय घेऊन रिक्षा चालकांचा व्यवसाय वाचवा अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांचे रिक्षाची प्रतिकृती देऊन स्वागत केले. या वेळी हि मागणी करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे उपाध्यक्ष आणि समर्थ शिक्षा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, कोरोनामुळे रिक्षाचालकांचे जगच बदलले आहे. रिक्षा व्यवसाय आणि रिक्षा चालक आर्थिक अडचणी मध्ये आहे. रिक्षा व्यवसाय बाबत नव्याने धोरण ठरवावे लागेल आणि भविष्यात धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. तरच रिक्षा व्यवसाय जिवंत राहील, यासाठी प्रशासन पातळीवरील अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.





