पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेत सुरुवातीला एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी महिलेचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. सुमन दौंडकर, मनोहर दौंडकर (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत.
जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारी एक तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमन आणि मनोहर हे गंभीर जखमी झाले. जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर गेला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.






