Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

पार्किन्सनसवर स्टेम-सेलवर जपानची नवी उपचारपद्धती! मेंदूत नवीन पेशी निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानामुळे लाखो रुग्णांसाठी आशेचा नवा किरण…

Stem cell therapy for Parkinson’s disease : जगभरात वाढत चाललेल्या पार्किन्सनस आजाराच्या उपचारासाठी जपानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पार्किन्सनससाठी स्टेम-सेलवर आधारित उपचारपद्धतीला अधिकृत मंजुरी देणारा जपान हा जगातील पहिला देश ठरला आहे. या निर्णयामुळे न्यूरोलॉजी आणि पुनरुत्पादक औषधशास्त्राच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही उपचारपद्धती “इंड्यूस्ड प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स” (आयपीएस सेल्स) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रक्रियेत प्रयोगशाळेत तयार केलेल्या स्टेम सेल्सपासून डोपामिन तयार करणाऱ्या मेंदूतील पेशी विकसित केल्या जातात आणि त्या रुग्णाच्या मेंदूत प्रत्यारोपित केल्या जातात. पार्किन्सनस रोगात मेंदूमधील डोपामिन तयार करणाऱ्या पेशी हळूहळू नष्ट होतात. त्यामुळे हात-पाय थरथरणे, हालचाली मंदावणे, शरीराचा तोल जाणे आणि स्नायूंमध्ये कडकपणा येणे अशी लक्षणे दिसतात. नव्या उपचारपद्धतीमुळे या नुकसान झालेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेऊ शकतात, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जपानमधील संशोधकांनी काही रुग्णांवर केलेल्या चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर सरकारने या उपचारपद्धतीला मर्यादित वापरासाठी मंजुरी दिली आहे. सुरुवातीला निवडक रुग्णांवर हा उपचार केला जाणार असून त्यानंतर त्याचा वापर वाढवला जाऊ शकतो.पार्किन्सनस हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजारांपैकी एक आहे. संशोधनानुसार जगभरात सध्या सुमारे १.१ ते १.२ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. गेल्या दोन दशकांत या आजाराचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. लोकसंख्येचे वाढते वय, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल यामुळे या आजाराचा प्रसार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०५० पर्यंत जगातील पार्किन्सनस रुग्णांची संख्या २.५ कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा –  रहस्य, थरार अन्…! ‘घबाडकुंड’ चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पाहा पहिली झलक…

भारतामध्येही पार्किन्सनस रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. विविध संशोधनांनुसार भारतात सुमारे ८ ते १० लाख लोक या आजाराने प्रभावित आहेत. तसेच जगातील पार्किन्सनस रुग्णांपैकी जवळपास १० टक्के रुग्ण भारतात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. देशात दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे १५ ते ४३ रुग्ण आढळतात. भारतातही लोकसंख्येचे वाढते वय लक्षात घेता येत्या काही दशकांत या आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पार्किन्सनस पूर्णपणे बरा करणारा उपचार अद्याप उपलब्ध नसला तरी औषधे आणि थेरपीद्वारे त्याची लक्षणे नियंत्रणात ठेवली जातात. मात्र जपानने मंजूर केलेली स्टेम-सेल आधारित उपचारपद्धती यशस्वी ठरल्यास भविष्यात या आजाराच्या उपचारांमध्ये मोठा बदल घडू शकतो आणि जगभरातील लाखो रुग्णांसाठी नवी आशा निर्माण होऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button