देवेंद्र फडणवीस चिंचवडमध्ये साधणार तरुणाईशी मुक्त संवाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील कर्तव्य फाऊंडेशन संस्थेच्या वतीने ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे आयोजन केले आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. उद्या (शनिवारी (दि. 11) सकाळी साडेनऊ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा महोत्सव होणार आहे. फडणवीस हे राजकारण विरहित विविध विषयांवर तरुणाईशी संवाद साधणार आहेत.
कर्तव्य फाउंडेशनने यावर्षी आयोजित केलेल्या युवा महोत्सवामध्ये विविध 28 स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये शहरातील चार हजार पेक्षा अधिक युवक युवतींनी सहभाग घेतला आहे. युथ फेस्टिवलमध्ये बुध्दीबळ, कॅरम, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथा लेखन, कथा सादरीकरण, व्यंगचित्र काढणे, रायफल शुटिंग, टेबल टेनिस, फेशन शो, व्हॉलिबॉल, ऑन द स्पॉट पेंटींग, पोस्टर मेकिंग, एकांकिका, वेशभूषा नसताना एकांकिका सादरीकरण, मूक अभिनय, नकला सादर करणे, रांगोळी आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.





