आमचं ठरलंय…‘डॅशिंग वुमेन’ सीमा सावळेंना पिंपरीच्या ‘आमदार’ करणार!

– पिंपरी विधानसभा निवडणुक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
– सोशल मीडियावर ‘आमचं ठरलंय’च्या ‘टॅगलाईन’द्वारे जोरदार ‘ब्रँडिंग’
पिंपरी | विशेष प्रतिनिधी|
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘डॅशिंग वुमेन’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘सोशल मीडिया’वर मोहीम हाती घेतली आहे. ‘आमचं ठरलंय’… अशा ‘टॅगलाईन’द्वारे सावळे यांना पिंपरी विधानसभेतून आमदार बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तशा आशयाच्या पोस्ट फेसबूक आणि व्हॉट्सॲपवर ‘व्हायरल’ होत आहेत. सावळे निवडणूक रिंगणात उतरल्यास पिंपरी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना तगडे आव्हान मिळणार आहे.
अनुसुचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभेसाठी ‘आरपीआय’बरोबरच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीकडे इच्छुकांनी दंड थोपाटले आहेत. गतविधानसभा निवडणूक अगदी थोड्या मतांच्या फरकाने गमावलेल्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे या ‘आरपीआय’ तथा महायुतीकडून उमेदवारीकरिता प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले ‘आरपीआय’ उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम हेदेखील उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचे देखील नाव इच्छुकांच्या यादीत आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांची अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. मात्र, शिवसेनेच्या संघटनात्मक प्रक्रियेत त्यांचे म्हणावे तसे योगदान नसल्याची शिवसैनिकांची तक्रार आहे. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून, विधान सभेकरिता शिवसेनेत आणखी एक दावेदार निर्माण केला आहे. ननावरे देखील आता प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे इच्छुक आहेत. मतदार संघात “आंदण’ सारखा सामाजिक उपक्रम सुरु ठेवत, सतत नागरिकांच्या संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.
दरम्यान, भाजप नगरसेविका सीमा सावळे, खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे तसेच नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे यांच्यासह नगरसेवक शैलेश मोरे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मध्यंतरी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनीही पिंपरी विधानसभेच्या तयारीबाबतचे ‘फ्लेक्स’ संपूर्ण मतदार संघात लावले होते.
****
पक्ष तर पक्ष…नाहीतर अपक्ष?
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सीमा सावळे यांना अमरावती मतदार संघातून लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आमरावतीत तळ ठोकला होता. तयारीही सुरू केली होती. पण, भाजप-सेना युती झाल्यामुळे सावळे यांचे लोकसभा निवडणुकीचे स्वप्न भंगले. त्यानंतर पिंपरीतून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली. स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात सावळेंनी शहरात विकासकामांची चुणूक दाखवली. त्यावेळीपासूनच त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चेला सुरूवात झाली. अमरावतीची संधी हुकल्यानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी पिंपरी विधानसभेकरीता त्यांचा प्राधान्याने विचार करतील, असे बोलले जाते. त्यातच विधानसभा निवडणूक लढवायची असं आमचं ठरलंय…त्यामुळे भाजपने तिकीट दिले तर ठिक नाहीतर… अन्य पक्षातूनही आम्हाला ‘ऑफर’ आहे, असा रेटा सावळे समर्थक कार्यकर्त्यांनी लावला आहे.





