breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या निविदेत कागदपत्रांची ‘बोगसगिरी’!

  •  परदर्शीपणाचा अभाव असल्याने निविदा तात्काळ रद्द करा
  •  भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांची आयुक्तांना मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून राज्यभरात शहराच्या लौकिकाला गालबोट लागले असतानाच आता रस्ते सफाई निविदेत बोगस कागदपत्रे सादर करुन ठेका लाटण्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे सदर निविदा तात्काळ रद्द करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयासाठी राबवलेली रस्ते सफाई निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते सफाईसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह असली तरी निविदा प्रक्रियेमध्ये गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे.
अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये सिक्युर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या संस्थेने सर्वात कमी दराने निविदा भरल्याचे दर्शविण्यात आले आहे. वास्तविक, संबंधित कंपनीने खोटी आणि निराधार कागदपत्रे जोडून महापालिका प्रशासनाची दिशाभूल केली आहे, असा आरोप नगरसेवक कामठे यांनी केला आहे.

तसेच, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या दुसऱ्या संस्थेने न्यायालयात दाद मागितली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशातून राबवलेली निविदा प्रक्रिया पारदर्शी असावी, अशी मागणीही नगरसेवक कामठे यांनी केली आहे.

  • माझ्याकडे पुरावे आहेत, ‘त्या’ संस्थेला काळ्या यादीत टाका…

संबंधित कंपनीने सादर केलेली कागदपत्रे आणि संबंधित कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत माझ्याकडे काही पुरावे आहेत. त्यामुळे प्रशासनाने निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी आणि चुकीच्या कामाला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीला लगाम घालावा. तसेच, सदर निविदा रद्द करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक कामठे यांनी केली आहे.

  • …अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार!

महापालिका प्रशासन निविदा राबवत असताना कागदपत्रे आणि इतर बाबींची शहानिशा करण्यासाठी दक्षता कमिटीकडे काम देत असते. पण, संबंधित कंपनीने राजकीय हस्तक्षेप आणि सदस्यांना हाताशी धरून चुकीची कागदपत्रे सादर केली आहेत. लोकांच्या कररूपी पैशातून राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया पारदर्शी होण्याबाबत आपण सकारात्मक भूमिकेतून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button